“विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान” सन १९५२ पासून भारतीय चिंतनावर आधारित शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण इत्यादि स्तरांवर विद्याभारती काम करीत आहे. तसेच या अंतर्गत संशोधन आणि प्रकाशन विभागही चालवले जातात. प्रकाशन विभागामार्फत विविध शैक्षणिक पुस्तके, मासिके, साप्ताहिके इत्यादि माध्यमातून वैचारिक साहित्य प्रकाशित केले जाते. प्रामुख्याने शिशुवर्ग ते उच्च शिक्षण तसेच संस्कार वर्ग, एक शिक्षकी शाळा, निवासी शाळा आदी ठिकाणी राष्ट्रीय मूल्यावर्धित शिक्षण देण्याचे काम विद्या भारती करते.
बालकांना केवळ साक्षर बनवणे पुरेसे नसून त्यांचा सर्वांगिण विकास करत परिपूर्ण माणूस घडविणे हे आवश्यक आहे. तसेच, वर्तमान परिस्थितीला व आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाणारी देशभक्त पिढी निर्माण करणे देखील महत्वाचे आहे. यासंबंधीचे विविध प्रयोग देशभर सुरु आहेत. या प्रयोगातून चांगले निष्कर्ष समोर येत आहे. या शिक्षण प्रणालीला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे.
सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक मूल्य जोपासणाऱ्या या शैक्षणिक उपक्रमांत आपणही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. विद्या भारती ही राष्ट्रीय विचारांची अखिल भारतीय संस्था आहे. अन्य शैक्षणिक संस्थाही विद्या भारतीशी संलग्न झाल्यास राष्ट्रीय विचारांची सक्षम पिढी घडविण्यात आपले योगदान महत्वाचे ठरू शकते.